मुलभूत गुणधर्म..!

मराठी बोधकथा मुलभूत गुणधर्म..!


मऊ असणारा दगड मला आजवर भेटला नाही.
टणक असलेला कापूस मला दिसला नाही.
थंड असणारा अग्नी मी कधी अनुभवला नाही
गरम असणार्‍या बर्फ़ाला मी आजवर स्पर्श केला नाही
उस मला कधी कडू लागला नाही
कारले पिकल्यावर खावून पाहिले तरी कडूच होते
झाडाकडून मला नेहमीच सावली मिळाली
 सापाने दंश दिला आणि
    विचंवाने डंख दिला. प्रेम त्यांनी कधी दिलेच नाही .

     खरंच आहे! कारण कठोरता हा दगडाचा गुणधर्म आहे. तो गुणधर्म त्यागला तर दग़ड राहत नाही. मऊपणा हा कापसाचा गुणधर्म आहे. गोड्पणा हा उसाचा आणि कडूपणा हा कारल्याचा गुणधर्म आहे. हे गुणधर्म सोडले तर, उस हा उस राहणार नाही आणि कारले हे कारले राहणार नाही. उष्णता हा अग्नीचा गुणधर्म आणि थंडपणा हा बर्फ़ाचा गुणधर्म.
     दंश करणे हा सापाचा गुणधर्म आहे आणि डंख मारणे हा विचंवाचा गुणधर्म आहे. साप आणि विंचू यांच्याकडून प्रेमाची अपेक्षा न केलेली बरी!
     काहीही असो निसर्गातील प्रत्येकजण आपाआपल्या गुणधर्माला घट्ट चिकट्लेला आहे . काहीही झाले तरी आपला गुणधर्म सोडायला तयार नाही.
     मग मानवाचा मुलभूत गुणधर्म कोणता? तर तो त्याच्या नावातच लपलेला आहे. मानवता हाच माणसाचा मुलभूत गुणधर्म मग वेळोवेळी मानव त्याचा हा मुलभूत गुणधर्म का सोडतो. कधी कडू कारल्यासारख्या वागतो, अग्नीसारखा तापतो. आणि सापविचू सारखा दंश करतो. निसर्गात कोणीच आपला मुलभूत गुणधर्म सोडायला तयार नसतांना का म्हणून मानवाने मानवता सोडून अन्य पशूंसारखे वागावे? गोडवा नसेल तर उसाला लोक ऊस न म्हणता कडबा म्हणतील मग मानवता सोडलेल्यांना मानव म्हणावे काय?