साबण आणि पुस्तके..!

बोधकथा साबण आणि पुस्तके..!


       टी.व्ही हे एक मजेशीर उपकरण आहे. शिकायचे म्हटले तर बरच काही टी.व्ही तील कार्यक्रमापासुन, जाहिरातीपासुन देखील शिकता येइल. फ़क्त शिकण्यासाठी शिकण्याची व्रुत्ती असली पाहिजे. शिकण्याची जर व्रुत्ती नसेल, तर डिस्कव्हरी चैनलवर दाखवणार्‍या कार्यक्रमामधील किंवा एन. सी. ई. आर. टी च्या कार्यक्रमामधुन ही काहीही बोध घेवू शकणार नाही. टी. व्ही वरच्या जाहीरातीही मनोरंजनात्मक.खरं पाहिले तर कार्यक्रम बनवण्यासाठी जेवढी प्रतीभा लागते. त्यापेक्षा अधीक कितीतरी प्रतीभा  टी.व्ही वरच्या जाहीराती बनवण्यासाठी लागते. कार्यक्रम  बनविणार्‍यांना त्यांची प्रतीभा दाखवण्यासाठी अर्धा ते एक तास इतका मोठा वेळ मिळतो. जाहीरातीत जाहीरात बनवणार्‍यांना मात्र त्याची प्रतीभा दाखवण्यासाठी काही सेकंदाची जागा मिळालेली असते . आणि म्हणून जाहीराती मनावर अधिक प्रभावी ठरतात . त्यांनी कमीत  कमी वेळेमध्ये अधिकाधिक परिणाम साधण्याची प्रव्रुत्ती आत्मसात केलेली असते .
     नुकतीच टी.व्ही वर एक जाहीरात पाहीली . जाहीरातीमधला एक मुलगा स्वत चे दात घासत असतो. आणी मग तो विचारतो, की, तुम्ही दररोज तुमचे दात् स्वच्छ करण्यासाठी किमान दहा मिनिटे गमावता .तो मुलगा विचारतो, परंतू रोज तुमचे दात व्यवस्थीत राहण्याकरिता तुम्ही दहा ते पंधरा मिनीटे गमवता परंतू तुमचा चेहरा व्यवस्थीत राखण्यासाठी तुम्ही किती वेळ देता? आणि साहाजिकच या प्रश्नाचे उत्तर आमच्या मनामध्ये नसते. प्रश्न आम्हाला खिळवून जातो आणि मग जाहिरातला मुलगा उत्तर देतो की अमुकअमुक कंपंनीचे क्रिम वापरा आणि आपला चेहरा सुंदर ठेवा.
      अधिक खोलवर विचार करुन जातांना माझं मन असा विचार करते की, खरोखरच आमच्या शरीराची निगा राखण्यासाठी आम्ही किती वेळ गमावतो . दात घासतो. केस कापतो आंगोळ करतो विशिष्ट साबण चोपाटतो आणि हे शरीर स्वच्छ राखण्याचा प्रयत्न करतो. परतू या शरीराच्या आतमध्ये जे मन बसलेले आहे. त्यावर देखील मळकट, कळकट विचारांचे पापुद्रे चढतात. वाइट विचारांची घाण चढते आणि पापांची धुळ येवून बसते. हे मन स्वच्छ करण्यासाठी आम्ही काय करतो? शरीराला स्वच्छ करणारा साबण बाजारामध्ये जागो जागी मिळतो. तसाच मनाला स्वच्छ करणारा साबण ही बाजारामध्ये उपलब्ध आहे  आणि मला असं वाटतं की, चांगली पुस्तक मनाला स्वच्छ करणार्‍या साबणासारखी आहेत.
      मग स्वत लाच आपण प्रश्न विचारा की, गेल्या वर्षामध्ये शरीर स्वच्छ करण्यासाठी मी किती रुपयांची साबण खरीदी केले? आणि मन स्वच्छ करण्यासाठी तुम्ही किती रुपयांचे पुस्तके खरेदी केले? असे दिसुन येते की, अनेक लोकांनी मन स्वच्छ करण्यासाठीचे साबण हाती देखील धरलेले  नाही.  
     
     शरीर महत्वाचेच पण त्या शरीराच्या आतमध्ये बसलेले मन अधिक महत्वाचे . कारण गाडी कितीही महत्वाची असली महागाची असली तरी आतील ड्राईवर चांगला नसेल, तर ती गाडी सुखरुप चालू शकत नाही म्हणुन गाडी सोबतच गाडीतल्या ड्राईवरची काळजी घ्या . मनाला स्वच्छ ठेवा . आणि मनाला स्वच्छ ठेवणारे साबण म्हणजेच पुस्तके, अधिकाधिक खरेदी करा!