अति सर्वत्र विवर्जयेतः

बदली झाली की गाव सोडावे लागते. घर बदलते. आजूबाजूचे लोकही बदलतात. तरीही आधीच्या गावची काही माणसे या ना त्या कारणामुळे आठवणीत राहतात . काही जाणीवपुर्वक संपर्कात राहतात.
      पुर्वीच्या काळी दुरवरच्या माणसाशी संवाद साधायचा म्हणजे कठीणच बाब होती. संदेशवहनाची साधणे तितकीशी विकसित झालेली नव्हती. मग एखादा मनुष्य काही कामानिमित्य दुसर्‍या गावाला जायचा. तो ज्या गावी जात असे, त्या गावात जर काही नातलग राहात असतील, तर पहिल्या गावातील माणसे अशा जाणार्‍याबरोबर निरोप द्यायची मग असा प्रवासाला निघालेला व्यक्ती सवड काढुन त्या गावकर्‍यांच्या नातलगाकडे जायचा आणि निरोप सांगायचा .
     टपालखात्याचा विकास झाला. एका गावातल्या माणसाचा संदेश दुसर्‍या गावात टपाल खाते पोहचवू लागले . पत्रलेखन ही एक कला बनली. अर्थात पत्र लिहून देणे आणि वाचुन दाखविणे या माध्यमातून पत्राची भाषा निरक्षरांनाही उमगू लागली.
     आता टेलीफोन आणी मोबाईलचे युग आहे, त्यामुळे पत्र विशेष या गोष्टी मागे पडल्या आहेत. मोबाईलवरुन एसएमएस करणे सहजसुलभ झाले आहे आणि रिक्षावाला, मोलकरीण सर्वांकडे मोबाईल पोहोचला आहे .
     माझा एक मित्र मला दररोज एसएमएस करतो. उत्तरादाखल मलाही त्याला एसएमएस करावा लागतो. बर्‍याचदा या एसएमएस मध्ये थोरमोठ्यांचे विचार असतात.
     एसएमएस वर होणारा खर्च वाचविण्यासाठी मी वेबसाईटवरुन संदेश पाठवू लागलो. दररोज संगणकावर बसणे शक्य नसल्यामुळे आठवड्यातुन एकदाच संगणकावर बसुन मित्राला सातसात एसएमएस  पाठवू लागलो.
     एक दिवस मी एसएमएस  टाईप केला दररोज एक सफरचंद डॉक्टरला दुर ठेवते, पण आठवड्यातुन एकाच दिवशी सात सफरचंद खाणे योग्य नव्हे. 
     चटकन माझ्या लक्ष्यात आले कि, एसएमएस  बाबतीत माझ्याकडुन नेमकी हिच चूक घडत होती . मी स्वतःला सुधारले. दररोज संगणकावर बसु लागले. आठवड्यातून एकदाच सात संदेश न पाठवतात दररोज एकच संदेश पाठवायला सुरुवात केली.
     आहे की नाही गंमत! "जे सल्ले आम्ही इतरांना देत असतो, त्या सल्ल्याची सर्व प्रथम आम्हालाच गरज असते."