धार्मिकता..!

वृक्षाचे महत्त्व सांगणारी अनेक सुभाषिते संस्कृत भाषेमध्ये आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे असे संत तुकारामांनी म्हटले आहे. अनेक कवींनी झाडे-वेली यांच्यावर कविता केल्या आहेत.
     झाडे आहेतच तशी महत्त्वपुर्ण. झाडे आहेत म्हणुन जीवन आहेत. ज्या दिवशी झाडे संपतील त्या दिवशी पृथ्वीवरील जीवन संपलेलं असेल. मागे उरतील ओस पड्लेले मोठमोठे कारखाने!
      आमच्या संस्कृतीमध्ये झाडांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आदिवासींच्या गुफाचित्रामध्ये झाडे रेखाटलेली आढळतात. वारल्यांच्या चित्रामध्ये झाड हमखास असतात. झाडे आडनाव असणारी माणसे आमच्याकडेही आहेत. कंदब, आंबेवडे, पिंपळगावकर, वडगाव, पिंपळगाव अशी झाडांची नावे असणारी गावे ही हमखास सापडतात.
       आमच्या प्रत्येक धर्मामध्ये झाडांना महत्त्व आहे. मुस्लिम धर्म आणि खजुराचे झाडे यांचे नाते आहे. ख्रिश्चनांना ख्रिसमस ट्री प्राणप्रीय तर बौध्दांना बोधिवृक्ष पुजनीय वाटतो. वटसावित्रीला हिंदु महिला वडाच्या झाडाची पुजा करतात. सणप्रसंगी आब्यांची पानांचेच तोरण लावले जाते. तुळशीवृदांवन प्रत्येक हिंदुच्या घरी हमखास सापड्ते.  शिवाय उबंर, पिंपळ इ. झाडे देखिल हिंदु धर्मात पवित्र मानलेली आहेत.
        झाडाप्रमाणेच आम्ही माणसे प्रतिमेमध्ये ही देव पाहतो. परंतु प्रतिमा निर्जिव असते व झाड जिवंत असते. निर्जिव असणार्‍या प्रतिमेची थोडी विटंबना झाली, तर त्या त्या धर्मियांच्या भावना उफ़ाळून येतात. लोक रस्त्यावर उतरतात. रास्ता रोको करतात. परंतु धर्मामध्ये महत्त्वपुर्ण स्थान असणारे जिवंत झाड कुणी तोडले तरी फारशी दखल घेत नाही. स्वतःला धार्मिक म्हणवणारे आम्ही सर्वच धर्माचे लोक, आमच्या डोळ्यादेखत झाडांची कत्तल होतांना तरी आम्ही स्वस्थ बसून राहात असू, तर स्वतःला धार्मिक म्हणवण्याचा आम्हाला खरोखरच काही नैतीक अधिकार उरतो काय?