निवड..!

मराठी बोधकथा निवड

 
    लहानपणी घरची बरीच कामे मी करायची! नौकरी निमीत्याने आईवडील कामात व्यस्त असायचे . त्यामुळे घरी किराणा आणणे. बाजारातुन भाजी-पाला आणणे ही जबाबदारी माझीच!
     कुठलासा सण होता . आईला पुजेसाठी नारळ हवे होते. कालच घरातील पाण्याचा माठही फुटला होता. आईने मला बाजारात धाड्ले आणि नारळ व माठ आणायला सांगितले.
     सर्वप्रथम मी वाण्याकडे गेली. नारळ पाहिजे असे सांगीतले. वाण्याने दुकानाच्या दरवाज्याजवळ नारळाचे पोते ठेवले होते. त्या पोत्यामधुन नारळ निवडुन घ्यायला त्याने मला सांगितले. मी नारळाच्या पोत्यामधुन नारळ निवडू लागली. त्यांना वाजवून बघू लागली. एक नारळ चांगला खणखणित वाजला पैसे देवून तो नारळ मी विकत घेतला.
       मग मी कुंभाराकडे गेली. माठ पाहिजे असे त्याला सांगीतले, त्याने माठ दाखविले . तो माठ दाखवित होता . ते माठ मी हातातल्या अंगठीने वाजवून बघत होते. कच्या माठातून बसका आवाज निघत होता. पक्के माठ खणखणित आवाज करत होते, टणटण असा खणखणित आवाज करणारा माठ मी विकत घेतला . घराकडे परत निघाली .
     वाटेत चालतांना डोक्यात विचारचक्र फिरु लागले. नारळाची निवड केली ती वाजवून . खडखड वाजला तोच नारळ निवड्ला . मठाची निवड केली ती वाजवून. टणटण वाज़ला तोच माठ निवडला . वाजवण्यासाठी आघात करावा लागला . आघात हा संकटासारखा.
     आमच्यावर येणारी संकटे ही आघातासारखी ती आम्हाला वाजवून बघतात. आम्ही टणटण वाज़लो नाही म्हणजे आम्ही त्यांना उत्तर दिले नाही. आम्ही टणटण वाजणे म्हणजे आम्ही संकटाना खणखणीत उत्तर देणे.
     निसर्गाला आमची निवड करावयाची असते. संकटाचा आघात करुन निसर्ग आम्हाला वाजवून बघतो. आम्ही या आघाताला खणखणित उत्तर दिले तर आम्ही पक्के आहोत असे मानून निसर्ग आमचीच  निवड करतो .
    तेव्हा यापुढे संकटाचा आघात झाला तर आपल्याला निवडण्यासाठी निसर्ग आपल्याला वाजवून बघतोय असे समजायला हरकत नसावी.